Tuesday, 8 May 2018

डोंगररांगांच्या वरती

डोंगररांगांच्या वरती
मेघांना येते भरती
अनिवार मनाला ओढ
चुळबुळते केवळ धरती


Copyright © roopavali. All rights reserved

सैरभैर

तुझ्या वाटेकडे डोळे
मन चातकाचे झाले
तुझी बनून मी मीरा
घोट विषाचे घेतले

नाही कसला सांगावा
सैरभैर जीव माझा
कसे जगू सांग आता
श्वास तुझ्यासवे दिले

Copyright © roopavali. All rights reserved

Wednesday, 21 February 2018

जग जवळ येत चाललंय

जग जवळ येत चाललंय
मात्र अंतर वाढतंय
माणसामाणसांमधलं
स्वतःपासूनचं.

लाईक्समधे मोजली जातेय मैत्री.
रोजच्या विचारपुशीवर
अवलंबून बसलीये आपुलकी.

वाचकांपेक्षाही
उदंड झालेत लेखक.

रोज शिकली जातेय
कला नवनवीन
ती पूर्ण अंगात मुरवण्याआधीच
भरताहेत प्रदर्शनं
मिळताहेत टाळ्या तेवढ्यापुरत्या तरी.

एक आभासी तुरा
शिरपेचात जेमतेम खोवतानाच
नव्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू होतोय
घाईघाईत.
प्रत्येक क्षण जगण्याआधीच
दाखवण्याची
जीवघेणी घाई.

त्यातूनच दिसत राहतात
पूर्वी कधीतरी भेटणारी नावं
डोळ्यांसमोर रोज.
सतत.
रोज ताज्या होतात
प्रत्येक नावासोबतच्या
छोट्यातल्या छोट्या आठवणी
अडवून बसतात मेंदूमधली
त्यांची त्यांची जागा.
माझ्या मेंदूत आता राहिला नाही
निवांत कोपरा
माझ्याचसाठी.

जग जवळ येत चाललंय
आणि अस्पष्ट होत चाललेत
सगळेच चेहरे
माझ्यासकट.


Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday, 20 February 2018

पाऊसथेंब

पावसाचे थेंब झेलायला तू नेहमीच धावतेस
मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यांनी पाऊस पाहत राहतेस

दुसरा थेंब झेलताना पहिला गळून जातो
अन् नवीन थेंबही हातून हळूच पळून जातो

तरी थकत नाहीस अन् अशीच खेळत राहतेस
अल्लड बालेसारखी मनमुराद भिजत राहतेस

कसं समजत नाही तुला, आयुष्य असंच असतं
म्हटलं तरी मुठीत बंद करता येत नसतं

क्षण असेच निसटत राहतात प्रत्येकाच्या हातून
एकास पकडू जाता अलगद् दुसरा जातो सुटून

जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा नसतो खेळ
परत झेलता येत नाही निघून गेली वेळ!


Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 20 November 2017

Friday, 3 March 2017

८ मार्च

आता पुन्हा ८ मार्च येईल
अचानक सगळ्यांना पब्लिक फोरम्सवर
बायकांचा पुळका येईल
व्हॉट्सअ‍ॅपवर स्त्री ची महती सांगणारे मेसेज येतील
फेसबुकवर 'रिस्पेक्ट विमेन' चे व्हिडिओज येतील
स्त्री शक्ती वगैरे आठवेल लोकांना
त्यातही
ती वेगवेगळ्या भूमिका कशा उत्तम निभावते
याबद्दल निबंध येतील
तिने कसे असले पाहिजे याबद्दल कविता येतील
जागतिक महिला दिनानिमित्त
क्रीम्स, शॅम्पूच्या भावनिक जाहिराती वाढतील
फेअरनेस क्रीम्सच्या जरा जास्तच
स्त्री ला देवता म्हणून नमस्कार पण केले जातील
निदान दाखवण्यापुरते

८ मार्चलाही
न्यूजपेपरमधेही असतील बातम्या
बलात्काराच्या
अ‍ॅसिड फेकल्याच्या
जीव घेतल्याच्या
त्याच पानावर
नारीशक्तीला सलाम करणारी
स्मार्ट, हसर्‍या, टिपटॉप साडीतल्या 'आई'चं चित्र असणारी
अर्धं पानभर झळकणारी
कसल्याश्या वस्तूची जाहिरात
सवलतीची रक्कम दिमाखात झळकवत

८ मार्चलाही
बायकांना मात्र
बाईपणातून सवलत देत नाही कोणीही


Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday, 28 February 2017

सन्नाटे

अतीत की रेशम पुडीयासे अंजानेसे काँटे निकले
रिश्तोंमें खामोशी थी, वह मीलों के सन्नाटे निकले


Copyright © roopavali. All rights reserved