Monday 14 January 2013

घुसमट

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष

भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड

धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ


Copyright © roopavali. All rights reserved

मारवा

तुटल्या नात्याचे तुकडे
मी सांग कसे सांधावे
रेशीमधाग्यांचे बंध
अन् पुन्हा कसे बांधावे

वाटेवर नुसत्या काचा
भोवती गर्द अंधार
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली
मी जवळ तुझ्या येताना
वाढवले फक्त दुरावे

मारवा जीवाला छळतो
मन उदास अन् एकाकी
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!
 
 
 

Copyright © roopavali. All rights reserved

Wednesday 9 January 2013

रस्सीखेच

मीच ढग, पाऊस मी, मातीत गेलो मिसळुनी
मी मला शोधू कसा, ना राहिलो कोठेच मी

जवळ ती होती कधी, आभास आता राहीले
होत अश्रू टपकतो गाली तिच्या हलकेच मी

नाव माझे चर्चिले गेले अनेकांच्या मुखी
होत बदनामीच होती, समजलो भलतेच मी

वाटले मी उत्तरे होतो सवालांची तिच्या
समजले आता मलाही फक्त होतो पेच मी

'विसरले सारे!' मनाला मी जरा समजावले
अवचितच पुढच्या क्षणाला हाय खाल्ली ठेच मी

ती जगाला दाखवे आता सुखाने नांदते
अंतरी वसते तिच्या जी तीच रस्सीखेच मी



Copyright © roopavali. All rights reserved