Tuesday 14 May 2013

रात्र पाऊस पाऊस

अश्या कोंदटल्या राती
टपकत्या मेघांसवे
मन मोकळे करावे
घ्यावी वाटून आसवे

ओला बधीर गारवा
घ्यावा वेढून जरासा
गोठाव्यात संवेदना
थोडा मिळावा दिलासा

झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे


Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday 7 May 2013

व्यथा

आयुष्य एका हाताने देतं तर इतर अनंत हाताने काढून घेतं हेच खरं असावं. कारण जमाखर्च मांडायला गेलं की कळतं, काल सुखाचा ढीग जमेत आहे असं वाटत होतं त्याच्या जागी आज वाकुल्या दाखवणारं रिकामपण आहे. आपली चूक इतकीच की आपण खूष व्हायची घाई केलेली असते. आता नशीब, नियती कोणाच्याही डोक्यावर खापर फोडलं तरी घडलेलं बदलत नाही. हातात राहतं ते इतकंच... हताश डोळ्यांनी सारं काही जाताना पाहणं!

हे जे घडलं ते का घडलं, असंच का घडलं... कोण चुकलं हे निरर्थक प्रश्न हुळहुळत राहतात. त्यांना काही अर्थ नाही. हातून पुन्हा एकदा एखादा हात सुटलेला असतो. हृदयाच्या काचेला अजून एक मोठ्ठा तडा गेलेला असतो. जी स्वप्नं आपल्या नशीबात नाहीत ती पाहण्याची शिक्षा पुन्हा मिळालेली असते. शब्द... शब्दच राहीलेले असतात. कोणालातरी दुखावल्याचं अजून एक पातक additionally डोक्यावर आलेलं असतं. आपल्याच भावनांशी प्रामाणिक राहिल्याबद्दल मिळालेलं हे बक्षीस!

भळभळती जखम घेऊन फिरणार्‍या अश्वत्थाम्याची व्यथा नेमकी आपल्याच वाट्याला यावी... याची तक्रार कोणाकडे करायची?


Copyright © roopavali. All rights reserved

Monday 6 May 2013

कळले नाही...!

मी थांबले आणि संपले कधी, कळले नाही
वाटेत एकटी राहीले कधी, कळले नाही

मी उन्हात सुद्धा जात राहीले तुझ्याच मागे
पायाचे तळवे पोळले कधी, कळले नाही

ऋतू आले गेले, वाट पाहीली तरी तुझी मी
ते वेडे वय अन् सरले कधी, कळले नाही

मी बेरीज करता सारे काही वजाच झाले
अन् शून्य फक्त हे उरले कधी, कळले नाही!


Copyright © roopavali. All rights reserved

Saturday 4 May 2013

आवर्तन

आवर्तन उठते पुन्हा एक परिचितसे
मी तिथेच येते फिरून घेऊन वळसे

इच्छांच्या डोही तरंग अस्फुट उठले
मी मिठीत आसक्तीच्या डोळे मिटले

एका चक्रातून दुजात जाण्यासाठी
धावते सतत वेड्या स्वप्नांच्या पाठी

कर्दमात गेला पाय रुते खोलात
तरी या वाटेची कशी ओढ अज्ञात!


Copyright © roopavali. All rights reserved