Saturday 29 June 2013

मला सांग...

तुझी मी अन् माझा तू
आपलं कधीच ठरलंय ना?
मनामध्ये काठोकाठ
प्रेम सुद्धा भरलंय ना?

तरी पावलं उंबर्‍याआड
चौकट काही तुटत नाही
मी उधळलं सारं तरी
तुझं घर सुटत नाही

आत्ता नाही पुढच्या जन्मी
माझाच व्हायचं दिलंस वचन
तोपर्यंत सांग कसं मी
सावरत राहू माझं मन?


Copyright © roopavali. All rights reserved

तुझी धून


तुझा ध्यास, आभास छळतो जीवाला
आतुरल्या क्षणांची स्थिती बावरी
विचारांत माझ्या तुझी धून आता
तनुतून घुमते तुझी पावरी



Copyright © roopavali. All rights reserved

विरह


तुझी वाट पाहून डोळे थकावे
तरी नीज यावी न त्यांच्या घरी
जरासा विरहही युगांचा दिसावा
निशा चांदण्याची अशी बोचरी


Copyright © roopavali. All rights reserved

Saturday 22 June 2013

ओढ

तुझ्या आठवांच्या सरी कोसळाव्या
पुन्हा मी भिजावे अधाश्यापरी
मिटावी न तृष्णा तुला भेटूनीही
तुझी ओढ ऐसी जळावी उरी


Copyright © roopavali. All rights reserved

Saturday 15 June 2013

ओली उबदार रात्र

बाहेर कोसळता पाऊस
आणि फायरप्लेस मध्ये जळणारी मंद आग
अशी ओली उबदार रात्र...
आणि तुझी साथ!

ढगांच्या आवाजाहूनही मोठी
माझ्या मनाची वाढती धडधड
तापलेले श्वास
पेटलेले स्पर्श
चहाहून जास्त वाफाळलेले तू आणि मी

पावसाच्या थेंबांसारखे
अलवार गाण्याचे सूर
तुझे माझे शब्द व्यक्त करणारे
आपल्या लयीशी होड घेणारे...

बाहेर कोसळता पाऊस
आणि आत चिंब होणारे आपण
अशी ओली उबदार रात्र
देशील?


Copyright © roopavali. All rights reserved

Monday 10 June 2013

मागे वळून पाहते तेव्हा

मागे वळून पाहते तेव्हा
दिसतो लांबलचक एकाकी रस्ता
समोर पसरलेल्या रस्त्यासारखाच

मागे वळून पाहते तेव्हा
मोजून घेते मनातले घाव पुन्हा
खपल्या निघता निघत नाहीत

मागे वळून पाहते तेव्हा
हातून सुटलेले हात दिसतात
अन् सलतो न दिसणारा काळ

मागे वळून पाहते तेव्हा
अंधारभरल्या सावल्या छळतात
पुढचंही दिसत नसतं नेमकं

मागे वळून पाहते तेव्हा
माझीच राख मला खिजवत राहते...
मागे वळायला 'तू' राहीली आहेसच कुठे?


Copyright © roopavali. All rights reserved