Wednesday 21 February 2018

जग जवळ येत चाललंय

जग जवळ येत चाललंय
मात्र अंतर वाढतंय
माणसामाणसांमधलं
स्वतःपासूनचं.

लाईक्समधे मोजली जातेय मैत्री.
रोजच्या विचारपुशीवर
अवलंबून बसलीये आपुलकी.

वाचकांपेक्षाही
उदंड झालेत लेखक.

रोज शिकली जातेय
कला नवनवीन
ती पूर्ण अंगात मुरवण्याआधीच
भरताहेत प्रदर्शनं
मिळताहेत टाळ्या तेवढ्यापुरत्या तरी.

एक आभासी तुरा
शिरपेचात जेमतेम खोवतानाच
नव्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू होतोय
घाईघाईत.
प्रत्येक क्षण जगण्याआधीच
दाखवण्याची
जीवघेणी घाई.

त्यातूनच दिसत राहतात
पूर्वी कधीतरी भेटणारी नावं
डोळ्यांसमोर रोज.
सतत.
रोज ताज्या होतात
प्रत्येक नावासोबतच्या
छोट्यातल्या छोट्या आठवणी
अडवून बसतात मेंदूमधली
त्यांची त्यांची जागा.
माझ्या मेंदूत आता राहिला नाही
निवांत कोपरा
माझ्याचसाठी.

जग जवळ येत चाललंय
आणि अस्पष्ट होत चाललेत
सगळेच चेहरे
माझ्यासकट.


Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday 20 February 2018

पाऊसथेंब

पावसाचे थेंब झेलायला तू नेहमीच धावतेस
मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यांनी पाऊस पाहत राहतेस

दुसरा थेंब झेलताना पहिला गळून जातो
अन् नवीन थेंबही हातून हळूच पळून जातो

तरी थकत नाहीस अन् अशीच खेळत राहतेस
अल्लड बालेसारखी मनमुराद भिजत राहतेस

कसं समजत नाही तुला, आयुष्य असंच असतं
म्हटलं तरी मुठीत बंद करता येत नसतं

क्षण असेच निसटत राहतात प्रत्येकाच्या हातून
एकास पकडू जाता अलगद् दुसरा जातो सुटून

जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा नसतो खेळ
परत झेलता येत नाही निघून गेली वेळ!


Copyright © roopavali. All rights reserved