Monday, 15 April 2013

तुझ्याशी बोलत असते तेव्हा...

तुझ्याशी बोलत असते तेवढाच वेळ चालू असतो माझा श्वास
मग चालू होतं तुझी वाट पाहणं
श्वासांनी पडून राहणं
निपचित
तुझ्याशी बोलत असते तेव्हाच नेमके शब्द होतात मुके
नंतर मात्र त्यांना कंठ फुटतो
आठवणींचे कढ येतात
एखादी कविताही जमते मग
तुझ्याशी बोलत असते तेव्हा स्वप्न, सत्य, भास, आभास असलं काहीतरी सुचतं
तू गेलास की सगळे मिसळतात
एकमेकांत विरघळून जातात
अगदी तुझ्यामाझ्यासारखे
तुझ्याशी बोलत असते तेव्हा एकरूप वाटणारे आपण
तू जाताच वेगळे होतो
विरहाचे सल सलतात
तुझेमाझे क्षण छळतात
हुरहूर दाटते केवळ
तुझ्याशी बोलत असते तेव्हा वाटतं काळ थांबावा इथेच
हे बोलणं संपूच नये
वास्तव वगैरे काही असूच नये ...

जमत नाही आता तुझ्याशिवाय जगणं!!


Copyright © roopavali. All rights reserved

Thursday, 4 April 2013

हासिल

ठंड रिस जाए अंदर तक यूँ...
दिल पिघलने ना पाए
इस ठंडे शहर से इतना तो हासिल हो!


Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 1 April 2013

तृष्णा

तुझ्या हातांच्या आंचेने
अलवार मला वितळू दे
तुझ्या स्पर्शाच्या ओढीने
स्पंदनांना पळू दे

भान सुटू दे सगळ्याचे
उन्मळू दे, तोल ढळू दे
विखुरण्यासाठीच आसरा
तुझ्या मिठीत मिळू दे

नको दुराव्याची शपथ
श्वासात तुझ्या मिसळू दे
सोसू दे धग देहाची
आज तुझ्यासवेच जळू दे!

Copyright © roopavali. All rights reserved

Wednesday, 13 March 2013

भेटशील का?



(maayboli.com वर पूर्वप्रकाशित)

Copyright © roopavali. All rights reserved

सहजच..!

आयुष्यात ही जाणीव खूप भयानक वाटते... परतीचे दोर आपणच आपल्या हातांनी कापल्याची! कॉलेज संपतं.. सारे दहा दिशांना पांगतात... आपण मात्र ठरवलेलं असतं पक्कं की आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही. सुरूवातीला रोज फोन, २-३ दिवसांनी भेटणं वगैरे उत्साहात होतं. मग काही काळाने वाटू लागतं की आता आठवड्यातून एकदा भेटलं तरी चालेल... त्या आठवड्याचा महीना कधी होतो समजतही नाही. मग नोकरी... नवे मित्र...! त्याचे फोन तरीही येत राहतात अधूनमधून.... कंटाळून शेवटी ते फोनही कमी होतात. आता बोलण्यातही मधे मधे gaps येऊ लागतात. मनाची समजूत घातली जाते की आता वेळ मिळत नाही... Life busy झालंय पार! नंतर कधीतरी वाटतं... आताशा आपलं बोलणं होत नाही विशेष.. पण ठीक आहे... चलता है... तो तरी कुठे फोन करतो आता! आणि मग बर्‍याच वर्षांनी कधीतरी जुना काहीतरी reference सापडतो... आपल्याला अचानक जुन्याच मैत्रीचा नव्याने उमाळा येतो आणि.... मग फेसबुकात स्वतःचाच जुना चेहरा शोधायची आणि दाखवायचीही धडपड केली जाते...
"कसा आहेस? कुठे असतोस हल्ली?"
"बरा आहे. इथेच आहे. तू?"
"मी पण"
"..."
"जमलंच नाही रे touch मधे रहायला... projects, deadlines वगैरे... "
"it's ok!"
"भेटूया ना कधीतरी"
"हो. नक्कीच..."
"..."
"चल.. नंतर बोलू. meeting आहे. bye. tc."
समोरची chat window बघता बघता निर्जीव होते. तो "नंतर" बहुधा उगवतच नाही. फक्त एक दोर कापल्याची जाणीव कुठेतरी हुळहुळत राहते...


(maayboli.com वर पूर्वप्रकाशित)

Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 14 January 2013

घुसमट

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष

भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड

धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ


Copyright © roopavali. All rights reserved

मारवा

तुटल्या नात्याचे तुकडे
मी सांग कसे सांधावे
रेशीमधाग्यांचे बंध
अन् पुन्हा कसे बांधावे

वाटेवर नुसत्या काचा
भोवती गर्द अंधार
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली
मी जवळ तुझ्या येताना
वाढवले फक्त दुरावे

मारवा जीवाला छळतो
मन उदास अन् एकाकी
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!
 
 
 

Copyright © roopavali. All rights reserved