Sunday, 17 November 2013

रिश्ता

किश्तों में लिखी कहानी कि तरह ये अपना रिश्ता
उस पन्ने का इंतजार है मुझे जहॉँ मैं तुमसे मिल पाऊँ

Copyright © roopavali. All rights reserved

Sunday, 10 November 2013

कारवाँ

एक बेचैनी, कुछ ख़ालीपन सा
कुछ अधुरा कुछ जुडता हुआ
जिंदगीके अजीबसे मोड पे खडे हम
चाहतोंका कारवाँ गुजरता हुआ


Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday, 10 September 2013

नशीब

मी त्यास शोधले हरेक ग्रहगोलात
धुंडाळले आणि हाताच्या रेषांत

समजून घेतली कुंडलीतली स्थाने
चाळली पुन्हा जातकाची सारी पाने

अंगठ्या सजवल्या प्रत्येक बोटात
करवली अनुष्ठाने, पूजा अन शांत

हर देवस्थानी नित्य टेकला माथा
केले जप, म्हटले मंत्र, वाचल्या पोथ्या

व्रतवैकल्ये अन उपास करुनी झाले
सापडे तरी ना, नशीब कुठे हरपले




Copyright © roopavali. All rights reserved

Thursday, 29 August 2013

मनातले काही...

किती चालते, आपल्यामधले अंतर तरीही संपत नाही
किती बोलते, मनातले पण ओठांवरती उमटत नाही

तुला शोधते, ठाऊक जरी तू नाहीस कोठे अवतीभवती
जीव लावते, स्वप्नांवरती कधीच जी की माझी नव्हती

वाट पाहते, घडेल काही, मिळेल सारे हवेहवेसे
रटाळ जगणे, कात टाकुनी बनेल अवचित पुन्हा नवेसे

रात्र एकटी, दिवसा सगळ्यांमध्ये मी एकटीच आहे
आयुष्य माझे, माळ क्षणांची परंतु ती ही सुटीच आहे



Copyright © roopavali. All rights reserved

Sunday, 25 August 2013

आताशा मी…

मी काळाच्या धाग्यावरचा छोटासा क्षण
हातून सुटता पुन्हा पकडता येतच नाही

रस्ता लांबत जातो थांबत थांबत जाता
स्वप्नांच्या वाटेवर तुजला नेतच नाही

उगाच हळवे-बिळवे होणे हवे कशाला
भावभावना मनात झिरपू देतच नाही

जो तो ज्याचा त्याचा होतो वेळ आल्यावर
काही आता मी जीवास लावून घेतच नाही



Copyright © roopavali. All rights reserved

Thursday, 15 August 2013

हेच प्रेम आहे?

तुझी साथ तुकड्या-तुकड्यांत मी जोडत राहते
नाव तुझे नावाला जोडून खोडत राहते

मन तुझ्याभोवती असण्यासाठी करे विनवण्या
मी कितीकदा पण मन त्याचेही मोडत राहते

आपले नाते जपण्याचे कधी वाटे दडपण
खांद्यांवरती त्याचे ओझे ओढत राहते

पुन्हा पटवते स्वतःलाच 'हेच प्रेम आहे'
पुन्हा एकदा मला नव्याने तोडत राहते


Copyright © roopavali. All rights reserved

Saturday, 3 August 2013

मैत्रीदिन

सुखदु:खात माझी साथ देणाऱ्या
मला सावरायला हात देणाऱ्या
मला एकटं पाडणाऱ्या नियतीला
वेळोवेळी मात देणाऱ्या

कधी धीर देत तर कधी रागे भरत
कधी मला गरज असतानाच अवतरत
माझ्या प्रत्येक मूडला सहन करत
इथवर माझ्यासोबत येणाऱ्या

मला प्रत्यक्ष भेटलेल्या, न भेटलेल्या
दूर असून सुद्धा जवळ असलेल्या
माझ्या आयुष्यात हजारो रंग भरत
त्याचा अविभाज्य भाग बनलेल्या… 

माझ्या प्रत्येक मैत्राला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Copyright © roopavali. All rights reserved