Tuesday, 11 December 2012

पानांमागून पानं

पानांमागून पानं
शब्दांमागून शब्द
मनामध्ये वादळ
विचार मात्र स्तब्ध

डोळ्यांमधे अडकलं
मेंदूत नाही शिरलं
वाचलेलं ज्ञान सारं
जिथल्यातिथे उरलं

मिनीटकाटा तासकाटा
पळत राहीले पुढे
पुस्तकावर नजर
आत भावनांचे तिढे

प्रश्नांचेच प्रश्न
उत्तर कुठेच नाही
पानांमागून पानं
मी केवळ उलटत राही



Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 5 November 2012

स्वप्नांची वस्ती

भूतकाळाची राख सावडत
सुखी क्षणांच्या अस्थी शोधते
आयुष्याच्या उजाड गावी
मी स्वप्नांची वस्ती शोधते


Copyright © roopavali. All rights reserved

Thursday, 19 July 2012

श्यामलमाया

रुजून येती खोल मनातून
थेंबांची ही अगणित झाडे
झरझर झरती मेघ अनावर
विचार होती पाऊसवेडे

खेळ सावळा असा रंगला
भिजून गेली हरेक काया
चैतन्याने सजली सॄष्टी
भारून टाके श्यामलमाया!




Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 5 March 2012

तावदान

पुढेमागे होणारं खिडकीचं तावदान
एक वावटळ घरात घुसणारी
नि:शब्द बडबडीला आलेला ऊत
मधमाश्यांची गुणगुण, वैताग स्साला!
मोहाचं मोहोळ, डंखाचं सुख
कलंडू पाहतोय काचेचा ग्लास
भिरीभिरी वारं, भिरभिरत्या डोळ्यांत
तावदान अजूनही वाजतंच आहे!



Copyright © roopavali. All rights reserved

Sunday, 26 February 2012

आसरा

ज्या वळणावर तू भेटलायस
तिथून पुढे आता नाही पहायचंय
तुझ्याबरोबर आता मला
कायमचं तिथेच रहायचंय

तुझ्या शोधात किती भटकले
अन् कितीदा रस्ता चुकले
तुझ्या शोधात धावत  राहीले
माझ्या अस्तित्वालाही मुकले

आता थांबवायचंय सारं मला
आता... थांबायचंय जरा
माझ्या फिरस्त्या मनाला
देशील ना तुझा आसरा?



Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 20 February 2012

वर्तुळ

पुन्हा नव्या वाटा, नवी नावं
नवे चेहरे आणि नवी गावं
अव्याहतपणे चाललेलं हे चक्र...

एका वर्तुळातून दुसरं वर्तुळ
नवे व्यास पण केंद्रबिंदू तोच
परीघ मापणारी जुनीच पावलं
फिरून पहिल्याच बिंदूपाशी पोचणारी

नवी शिखरं, नवं आकाश
जुन्याचं काय करायचं सुचत नाही
अजून माझ्या मनाएवढी दुसरी जागा शोधायची आहे...

पुन्हा नवे अर्थ, नवे शोध
नवे शब्द, नवेच बोध
जुन्या वर्तुळात अडकून राहीलेला पाय

कुठवर जात राहणार हे असं?




Copyright © roopavali. All rights reserved

Thursday, 9 June 2011

असा कोसळे पाऊस...

असा कोसळे पाऊस, आंगोपांगी शिरशिरी
ताल धरेने धरला, वाजे थेंबांची टिपरी

असा कोसळे पाऊस, थंड ओला दरवळ
न्हाऊमाखू घातलेली, नवजात हिरवळ

असा कोसळे पाऊस, रस्त्यांचेही झाले नाले
साचलेल्या पाण्यातून, छपछपती पाऊले

असा कोसळे पाऊस, चिंब देहापरी मन
उरी भरून राहिली, आता फक्त त्याची धून