एकदा तरी मला तुझ्यातल्या तुझ्याशी बोलायचंय
तू गुणगुणत असलेल्या सुरावटीवर भान हरपून डोलायचंय
एकदा तरी मला तुझ्याबरोबर चांदणं झेलत जायचंय
तुझ्या डोळ्यातल्या नक्षत्रांचं लेणं मला ल्यायचंय
एकदा तरी तुझ्या श्वासांच्या लयीत मला हरवायचंय
तुझ्या मनाचं गूज मला माझ्या मनाला ऐकवायचंय
एकदा तरी तुझ्या हसण्यावर मला जीव ओवाळून टाकायचाय
तुझ्याबरोबर चालत जाताना मला एकदा रस्ता चुकायचाय
एकदा तरी मला तुला माझं झालेलं पहायचंय
आयुष्यभर मग मला तुझंच बनून रहायचंय
एकदा तरी मला असं बरंच काही करायचंय
तुझ्यासाठी जगायचंय आणि तुझ्यासाठी मरायचंय
Copyright © roopavali. All rights reserved