Wednesday, 15 October 2025

कधीतरी

अवेळीच अंदाधुंद बरसल्या सरी 
अशावेळी अवचित तू ही यावे घरी

चिंब माझ्या मनापरी देह तुझा ओला
गारव्यात जरा आग पेटूदेत उरी

वेड्या विचारांना घालताना मी लगाम
धावणाऱ्या श्वासांनीच करावी फितुरी 

समीप तू येता वाढो स्पंदनांचा वेग
अधरांचा जावा तोल स्पर्शाच्या तीरी 

खुळी आस खुळे भास पुरे झाले आता
प्रत्यक्षातही घडावे असे कधीतरी

 

 

 

Copyright © roopavali. All rights reserved

Wednesday, 25 August 2021

चांदण्याची भूलही पडली नव्याने
साथ जेव्हा लाभली त्याला तुझी
पारिजाती स्पर्श सोसायास आतुर
रात वेडी जागली होता तुझी

 

Copyright © roopavali. All rights reserved

बेमालूम

"माझ्या कविता वाचतोस ना?"
माझा संभाषणाला टँजंट प्रश्न
मनातला गोंधळ जराही स्वरात न आणता तुझं उत्तर...
"हो, परवाची ना? ऑफकोर्स!"
डोळे अजूनही ऑफिसच्या मेलवर खिळलेले
"परवाची वेगळी. ही आज टाकली आहे"
"हो हो, ही काय वाचतोच आहे.."
कीबोर्ड हळुहळू बडवल्याचा आवाज
मगाचच्या मेलला उत्तर लिहीणं चालू असावं
"हे काय रे! तुझ्यासाठी इतकं भरभरून लिहायचं
आणि तू मात्र..."
"ऑस्सम! काय लिहीतेस गं तू!!"
बेमालूमपणे वेळ मारून नेण्याचा ट्रिओ झालेला असतो
पुढची मेल वाचणं सुरू...

 

Copyright © roopavali. All rights reserved

Monday, 25 January 2021

मेघ अनावर

मेघ अनावर अविरत झरती
निथळून गेली धरणी पुरती
होड लागली जलथेंबांची
बरसण्यास तव कायेवरती

अंगावरती फुले शहारा
जेव्हा स्पर्शून गेला वारा
तुझ्या सवे दरवळण्यासाठी
खटाटोप त्याचा हा सारा

अल्लड वार्‍याहूनी तू अवखळ
पावसाहूनी असशी निर्मळ
तुझ्या प्रीतीच्या वर्षावाने
भरून जावी माझी ओंजळ

 

© roopavali. All rights reserved

Monday, 23 March 2020

कोरोना की करुणा?

कोरोना व्हायरसकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर लक्षात येईल की त्याच्यामुळे गेले काही दिवसात कितीतरी चांगल्या गोष्टीच घडल्या आहेत. 

जगात लोकं सर्व भेदभाव, मारामाऱ्या विसरून गेली आहेत. प्रत्येक माणसात एकवाक्यता आली आहे. प्रत्येकजण केवळ या विषाणूला कसं पळवता येईल याचाच विचार करतो आहे. अभूतपूर्व एकता या निमित्ताने सर्वत्र पसरली आहे. कुठल्याही जातीधर्माचा, सांपत्तिक स्थितीचा, वर्णाचा कसलाही फरक न करता हा विषाणू आपले बळी घेतो आहे. त्याच्याकडून आपल्याला सर्वधर्म समभावच शिकायला मिळतो आहे. त्या निमित्ताने जनता एकत्र आली आहे. हा एक फायदाच नाही का?

ठिकठिकाणी लोकं एकदुसऱ्याला मदत करताना दिसत आहेत. नात्याची नसली, ओळखीची नसली तरी इतरांना मदत करणे, त्यांच्यासाठी खरेदी करणे, आपत्कालीन सेवा देणे हे सर्व करत आहेत. हा सेवाभाव आपल्या अंगी पुन्हा एकदा रुजवणारा हा विषाणू वाईट कसा काय म्हणायचा?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी प्रवास, बाहेर फिरणं आणि त्या निमित्ताने गाड्या वापरणं प्रचंड कमी केलं आहे. जे इतर कुठल्याही मार्गाने झालं नसतं ते घडलं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हायला लागला आहे. हवेचं, आवाजाचं प्रदूषण कमी झालं आहे. पुन्हा एकदा मोकळी शुद्ध हवा अनुभवता येऊ लागली आहे. आकाश धुरकट दिसण्याऐवजी स्वच्छ निळं दिसू लागलं आहे. गोंगाटात ऐकू न येणारा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. आपल्याला एरवीही गाड्यांचा वापर कमी करून अशी परिस्थिती निर्माण करता येऊ शकते याचा हा धडाच आपल्याला कोरोनाने दिला आहे.

माणसं आपल्या कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवू लागली आहेत. एकमेकांचे स्वभाव अधिक जाणून घेऊन त्यांच्याशी नातं अजून घट्ट करण्याची ही एक संधीच आपल्याला कोरोनाने दिली आहे. आपल्या कुटुंबासमवेत जेवण करणं, गप्पा मारणं हे किती सुखद आहे याची जाणीव या निमित्ताने पुन्हा झाली आहे. माणसामाणसातले दुरावे नष्ट होऊ लागले आहेत. आपल्या माणसांचा सहवास, प्रेम लोकांना मिळू लागले आहे आणि त्यामुळे मनःशांती वाढीस लागली आहे.

असा हा शांतीचा संदेश देणारा, आपसातले भेदभाव विसरायला लावणारा विषाणू! खरोखरच करुणा विषाणू असला पाहिजे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपला होणारा नाश थांबवायला आलेला करुणामय दूतच हा! त्याने दिलेला हा संदेश आपण गंभीरपणे घेतला पाहिजे. यातून घडत असलेले चांगले बदल पुढेही चालू ठेवले पाहिजेत.




Copyright © roopavali. All rights reserved

Tuesday, 8 May 2018

डोंगररांगांच्या वरती

डोंगररांगांच्या वरती
मेघांना येते भरती
अनिवार मनाला ओढ
चुळबुळते केवळ धरती


Copyright © roopavali. All rights reserved

सैरभैर

तुझ्या वाटेकडे डोळे
मन चातकाचे झाले
तुझी बनून मी मीरा
घोट विषाचे घेतले

नाही कसला सांगावा
सैरभैर जीव माझा
कसे जगू सांग आता
श्वास तुझ्यासवे दिले

Copyright © roopavali. All rights reserved