Wednesday 9 January 2013

रस्सीखेच

मीच ढग, पाऊस मी, मातीत गेलो मिसळुनी
मी मला शोधू कसा, ना राहिलो कोठेच मी

जवळ ती होती कधी, आभास आता राहीले
होत अश्रू टपकतो गाली तिच्या हलकेच मी

नाव माझे चर्चिले गेले अनेकांच्या मुखी
होत बदनामीच होती, समजलो भलतेच मी

वाटले मी उत्तरे होतो सवालांची तिच्या
समजले आता मलाही फक्त होतो पेच मी

'विसरले सारे!' मनाला मी जरा समजावले
अवचितच पुढच्या क्षणाला हाय खाल्ली ठेच मी

ती जगाला दाखवे आता सुखाने नांदते
अंतरी वसते तिच्या जी तीच रस्सीखेच मी



Copyright © roopavali. All rights reserved

No comments:

Post a Comment