Monday 14 January 2013

मारवा

तुटल्या नात्याचे तुकडे
मी सांग कसे सांधावे
रेशीमधाग्यांचे बंध
अन् पुन्हा कसे बांधावे

वाटेवर नुसत्या काचा
भोवती गर्द अंधार
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली
मी जवळ तुझ्या येताना
वाढवले फक्त दुरावे

मारवा जीवाला छळतो
मन उदास अन् एकाकी
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!
 
 
 

Copyright © roopavali. All rights reserved

No comments:

Post a Comment